बालक मंदिर प्राथमिक शाळेत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
४७५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण : हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहेत. गणपती हे गणांच्या सर्व वर्गांमध्ये सर्वोच्च मानले जातात. अशा ६४ कलांचे अधिपती असलेल्या गणरायाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी बालक मंदिर संस्था, प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी शारदा मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा हर्षे उपस्थित होत्या. गणपतीचे गाणे ऐकवून त्यांनी कार्यशाळेची सुरुवात केली. यावेळी शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थी देवांश आव्हाड व अंश शहा यांनी विद्यार्थ्यांना गणरायाची मूर्ती कशी घडवावी, याचे उत्तम मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या नाजूक हातांनी गणरायाच्या सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात शाळेतील तब्बल ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख भालचंद्र घाटे यांनी करून दिली, तर शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका विद्या घुले यांनी स्वागत केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार व शालेय समिती अध्यक्ष दीपक परब यांनी सुचवलेल्या विषयानुसार कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेतली. वरिष्ठ शिक्षिका विद्या घुले यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गणेशमूर्ती निर्मितीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात सर्जनशीलतेची भावना निर्माण झाली.
Kalyan, Thane | Sep 12, 2026