कोट्यवधींचा कचरा ठेका, तरी स्टेशनबाहेर कचऱ्याचे ढीग!सुमित एल्को कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
डोंबिवली स्टेशन परिसरात सुमित एल्कोच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह;भर मार्केट मध्ये चौकात साचवला जातोय कचरा ,कचरा उचलण्यासाठी अडीच तासांचा विलंब?
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना डोंबिवली स्टेशन परिसरातील एका व्हिडिओमुळे कचरा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या सुमित एल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्टेशनबाहेरील मार्केट परिसरातच मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
डोंबिवली स्टेशनबाहेरील भर चौकात कचरा एकत्र केल्यानंतर तो तात्काळ उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जवळपास दोन ते अडीच तास कचरा त्याच ठिकाणी पडून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होते.
डोंबिवली स्टेशन परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सकाळच्या वेळेत कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक या परिसरातून ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते आणि छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात. कचरा बराच वेळ त्याच ठिकाणी पडून राहिल्याने या विक्रेत्यांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठा निधी खर्च करत असताना, कचरा संकलन झाल्यानंतर तो तात्काळ उचलला का जात नाही?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Kalyan, Thane | Sep 12, 2026