मायक्रोफायनान्स कंपन्यांची दमदाटीने वसुली; तहसीलदार, पोलीस निरीक्षक रामटेक व बँक व्यवस्थापकास महा शेतकरी संघटनेचे निवेदन
Ramtek, Nagpur | Nov 2, 2026 दिवाळी व सणासुदीच्या या दिवसात मायक्रो फायनान्स कंपन्या गट कर्ज वसुलीच्या नावाखाली रामटेक तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण महिलांना दमदाटी करून सक्तीची वसुली करीत आहेत. संताप आणणाऱ्या या सक्त वसुलीने त्रस्त महिला, पुरुषांनी महा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भूषण कुटे,सर्कल प्रमुख विजय हारोडे यांच्या नेतृत्वात व काँग्रेसचे नगरसेवक रमेश कारामोरे यांचे मार्गदर्शनात सोमवार दिनांक 2 नोव्हेंबरला दुपारी तहसीलदार रामटेक यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार भोजराज बडवाईक व पोलीस निरीक्षक रामटेक राजेश कुमार थोरात यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की मायक्रो फायनान्स चे प्रतिनिधी उद्धट, अभद्र व अरेरावीची भाषा वापरून मानसिक त्रास देत आहेत. कर्ज परतफेड करण्यास थोडी सवड द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. पुढील आठ महिने सक्तीने हप्ते किंवा वसुली करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना हे प्रतिनिधी निर्देशाला केराची टोपली दाखवत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.