दुर्गाडी किल्ल्यावर विषारी नागाचा थरारक वावर; वॉर फाउंडेशनच्या प्राणी मित्रांकडून यशस्वी बचाव
कल्याण : कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मोठा विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्प आढळल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत शिताफीने त्याला सुरक्षितपणे एका ड्रममध्ये अडकवले. त्यानंतर पुढील मदतीसाठी वॉर फाउंडेशनचे प्राणी मित्र तन्मय माने यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच तन्मय माने यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने सर्पाचा यशस्वी बचाव केला.
सर्पाच्या बचावानंतर उपस्थित नागरिक आणि स्थानिकांना सर्पांबाबत जनजागृती करण्यात आली. विषारी सर्प हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असून, त्यांना न मारता सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बचाव करण्यात आलेल्या नागाची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियमांचे पालन करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वॉर फाउंडेशनकडून देण्यात आली.
सर्प संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी वॉर फाउंडेशनचे कार्य सातत्याने सुरू असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
Kalyan, Thane | Aug 28, 2026