पेण: पेण तालुक्यात सर्वत्र पुरस्थिती; घरांत पाच-सहा फूट पाणी, दरडी कोसळल्या, अनेक गावांचा संपर्क तुटला
Pen, Raigad | Jul 6, 2026 पेण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने कहर केला असून रविवार रात्रीपासून सोमवार दिवसभर पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये चार ते सहा फूट पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बाळगंगा, भोगावती, खरोशी, खारपाडा आणि पाबळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने त्यांच्या काठावरील आंतोरे, नवघर, तरणखोप, बारिवाडी, राधाकृष्णवाडी, खरोशी, दुरशेत, वरसई, उरणोली, सोनखार, जिते, रावे, दादर, तांबडशेत, कळवे आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.