मांजरा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर पोलिसांचा हातोडा; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर शासनाचा महसूल बुडवून मांजरा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा व तस्करी करणाऱ्या टोळीवर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धडक कारवाई करत दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सुमारे 700 ब्रास वाळूसाठा असा एकूण 45 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांना मौजे शिरोळ येथील वेताळवाडी वस्ती परिसरात अवैध वाळू साठा व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पथकाने छापा टाकला असता, बाळासाहेब सूर्यकांत शिंदे व दयानंद किशन कज्जेवाड (दोघे रा. शिरोळ वां., ता. निलंगा) हे दोघे मांजरा नदीतून विनापरवाना वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या साह्याने वाहतूक करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या असून, वेताळवाडी वस्तीतील शाळेजवळील तळ्यालगत पाहणी केली असता विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला तब्बल 700 ब्रास वाळूचा प्रचंड साठा आढळला. पंचनामा करून हा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 287/2026 अन्वये कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार श्रीराम सांडूर, कैलास शिंदे, विलास अर्जुने, विकास लोखंडे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास उपनिरीक्षक यू. जी. रायबोळे करीत आहेत.
Latur, Latur | Sep 21, 2026