गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात चोख पोलीस बंदोबस्त; संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे संचलन, ड्रोनद्वारे देखरेख
उदगीर - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि विसर्जन मिरवणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६० व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५, अशा एकूण ९५ गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक मेघना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ९ पोलीस निरीक्षक, ३९ पोलीस उपनिरीक्षक, ४१७ पोलीस अंमलदार तसेच २६६ होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय एसआरपीएफच्या २ तुकड्या, १ शीघ्र कृती दल पथक, २ दंगल नियंत्रण पथके, १ दामिनी पथक, गोपनीय शाखेचे ५ अंमलदार, १ बॉम्बशोधक व नाशक पथक, १ दहशतवाद विरोधी पथक तसेच १ स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.
*संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे संचलन*
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच मुख्य बाजारपेठेत पोलिसांचे संचलन करण्यात आले.
*ड्रोनद्वारे नजर; सोशल मीडियावर सायबर सेलचे लक्ष*
मिरवणुकांदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन व संवेदनशील ठिकाणांवरील हालचालींवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर सायबर सेलचे मॉनिटरिंग असणार आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन उदगीर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बिरप्पा भुसनूर यांनी केले आहे.
Latur, Latur | Sep 19, 2026