४६ किलो गांजाची ७ झाडे जप्त; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर:लातूर जिल्ह्यात अमली पदार्थाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. निलंगा तालुक्यातील बुजरगवाडी शिवारात उसाच्या शेतात लावलेली ४६ किलो ८७५ ग्रॅम वजनाची गांजाची ७ झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे २३ लाख ४३ हजार ७५० रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे बुजरगवाडी येथील वाघंबर लिंबापूरे यांच्या शेतात गांजाची अवैध लागवड केली आहे. माहितीच्या आधारे शिरूर अनंतपाळचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या सूचनेनुसार पथकाने गट क्रमांक १४ मधील जनार्दन भोईमार यांच्या शेतात छापा टाकला. पाहणी केली असता उसाच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली.
याप्रकरणी वाघंबर दिगंबर लिंबापूरे (वय ६०, रा. बुजरगवाडी) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अवैध विक्रीच्या उद्देशाने लागवड केल्याचा संशय आहे. पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सर्जेराव जगताप, माधव बिलापट्टे, युवराज गिरी, नवनाथ हासबे, संजय कांबळे व इतर अंमलदारांनी केली.
लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांची लागवड, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Latur, Latur | Sep 20, 2026