खुनाच्या गुन्ह्यातील तिघे जेरबंद; फॉरच्यूनरसह हत्यारे जप्त - LCB ची पळशी फाट्यावर धडक कारवाई
*लातूर:* शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पळशी फाटा येथे पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दोन धारदार हत्यारे आणि टोयटा फॉरच्यूनर असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात हे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते.
गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तीन आरोपी पळशी फाटा येथे पांढऱ्या रंगाच्या फॉरच्यूनर (क्र. MH 44 T 0221) मध्ये थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचांसह तिथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
*अटक आरोपींची नावे:*
१. अल्ताफखान सरदारखान पठाण (वय ४१, रा. मिलिंद नगर, परळी वैजनाथ, जि. बीड)
२. उमर मेहबुब शेख (वय २४, रा. आझाद नगर, परळी वैजनाथ)
३. खालेद हमीद शेख (वय ३९, रा. मिलिंद नगर, परळी)
वाहनाची झडती घेतली असता त्यात एक कोयत्यासदृश धारदार हत्यार आणि एक फोल्डिंग चाकू आढळून आला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हत्यारे व फॉरच्यूनर जप्त केले आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक राजेश घाडगे, माधव बिल्लापटे, तुराब पठाण, गोविंद येलमटे, पाराजी पुठेवाड, तुळशीराम बरुरे यांच्या पथकाने केली.
शिवाजीनगर येथील गु.र.नं. ४४७/२०२६, कलम १०३(१), १०९(१), ३(५) BNS या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
Latur, Latur | Sep 20, 2026