सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘Mental Health – मानसिक आरोग्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार सर
यांच्या पत्नी डॉ. रम्या कन्नन यांची विशेष अतिथी वक्त्या (Guest Speaker) म्हणून उपस्थिती होती. त्यांनी मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, कामाचा ताण, सकारात्मक विचारसरणी तसेच स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांना अत्यंत प्रभावी व मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सतत आव्हानात्मक व तणावपूर्ण परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक ताण किंवा भावनिक समस्या जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत संवाद साधणे, आवश्यकतेनुसार समुपदेशन घेणे आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणे याबाबत डॉ. रम्या कन्नन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यांनी दैनंदिन जीवनातील सहज-सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याशी संबंधित विविध बाबी समजावून सांगितल्याने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“निरोगी मन हे सक्षम आणि संवेदनशील पोलीस सेवेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे”, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
5 views | Solapur, Maharashtra | Sep 11, 2026