सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित
10 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 26, 2026 *सर्पदंश‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित* सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध. *उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार* *-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर* राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची तसेच सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाला करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे प्रभावी संनियंत्रण, वेळेवर उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस (ASV) उपलब्धतेचे नियोजन अधिक सक्षम होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो. सर्पदंशाची विषबाधा ही संभाव्यतः जीवघेणी स्थिती असून, वेळेत निदान, योग्य प्रथमोपचार, तातडीने रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकतेनुसार सर्पविष प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्पदंशाच्या घटनांची शास्त्रशुद्ध नोंद आणि त्यावर आधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाने अधिसूचना लागू केली आहे. *प्रत्येक घटनेची तातडीने नोंद* राज्यातील प्रत्येक आरोग्य संस्था आणि वैद्यक व्यवसायिकाने त्यांच्या निदर्शनास आलेली किंवा उपचाराधीन असलेली सर्पदंशाची प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटना संबंधित DHO/CS यांना कळवणे आवश्यक आहे.