
डायल 112 ला खोटा कॉल, पोलिसांची दिशाभूल!
पारधेवाडीच्या तरुणावर गुन्हा
किल्लारी : मला खूप मारहाण झाली आहे, मी जखमी आहे, मला चालता येत नाही, तात्काळ मदत पाठवा... असे खोटे कॉल करून डायल 112 या शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बाबुराव जाधव, नेमणूक पो.स्टे. किल्लारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महेश आणाराव भडके, वय 32, रा. पारधेवाडी, ता. औसा याने दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 10.40 वाजता व दि. 3 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.19 वाजता डायल 112 च्या MDT वर कॉल केला. दोन्ही वेळा त्याने मला मारहाण झाली आहे, मी जखमी अवस्थेत आहे, मला तात्काळ पोलीस मदत हवी आहे, अशी खोटी माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, सदर माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दि. 4 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 1.42 वाजता किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गु.र.नं. 339/2026, पोलीस ठाणे किल्लारी
कलम : भारतीय न्याय संहिता 212, 217 BNS
या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ यादव हे करीत आहेत. सपोनि यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायल 112 सारख्या आपत्कालीन सेवेचा असा गैरवापर केल्याने खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होतो, त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या कॉलपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Latur, Latur | Nov 7, 2026