माणुसकीचा दिवा : वृद्धाश्रमात फुलला आपुलकीचा प्रकाश
बाळासाहेब पाटोदे यांच्या पुढाकाराने मातोश्रीत अन्नधान्य, कपड्यांचे वाटप ; आमदार संजय बनसोडे यांची उपस्थिती
लातूर : वय झालं म्हणून माणूस परका होत नाही, त्याला फक्त आपुलकीची ऊब हवी असते... हाच संदेश देत नगरसेवक बाळासाहेब पाटोदे यांनी मातोश्री वृद्धाश्रमात 'माणुसकीचा दिवा' हा हृद्य उपक्रम राबवला. आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळाल्याने ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला. पण त्यापेक्षा जास्त आनंद त्यांना मिळाला तो सोबत घालवलेल्या काही आपुलकीच्या क्षणांचा.
आजच्या धावपळीच्या काळात ज्येष्ठांच्या भावना, गरजा अनेकदा दुर्लक्षित होतात. घर असूनही एकटेपणा वाटणाऱ्या या पिढीला 'तुम्ही एकटे नाहीत, समाज तुमच्यासोबत आहे' ही जाणीव करून देणे, हाच या उपक्रमाचा खरा हेतू होता.
वाटप करताना केवळ वस्तू दिल्या नाहीत, तर प्रत्येक ज्येष्ठाशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
केवळ मदत नव्हे, तर सन्मानाने जगण्याचा विश्वास देणे, हीच खरी माणुसकी आहे. 'माणुसकीचा दिवा' सारखे उपक्रम समाजात आपुलकी, संवेदना आणि सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणारे नगरसेवक बाळासाहेब पाटोदे यांच्यासह अनिल मुदाळे, अनिरुद्ध गुरुडे, सय्यद जानीमिया, नाना इब्राहिम, शैलेश गुरुडे, फैयाज शेख, शशिकांत बनसोडे, अभंग जाधव, मयूर बनसोडे, सुनील कपाळे, शिवकुमार कांबळे, चंद्रशेखर पाटील अतनूरकर, प्रदीप घोरपडे, आयाज देवणीकर, डी. एस. बिरादार, सतीश पाटील, अंकुश ताटपल्ले, अजित फुलारी, अदनान जादूगार आदी मित्रपरिवारातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Latur, Latur | Nov 9, 2026