
ऑक्सिजन सिलेंडर चोरीच्या आंतरजिल्हा गुन्हेगारी साखळीचा लातूर पोलिसांकडून पर्दाफाश!
११ गुन्ह्यांची उकल; २० ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्या, १.७७ लाख रुपये व बोलेरो पिकअपसह १४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एक आरोपी ताब्यात.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २० ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या, चोरीच्या ५१ सिलेंडर विक्रीतून मिळालेली १ लाख ७७ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १४ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांसह नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकास निर्देश दिले होते.
दिनांक ०४/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ऑक्सिजन सिलेंडर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत काळे बोरगाव येथील तानाजी चौक परिसरात बोलेरो पिकअप वाहनामध्ये चोरीचे ऑक्सिजन सिलेंडर विक्रीसाठी घेऊन एक इसम थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोलेरो पिकअप वाहनासह एक इसम मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव उमाकांत सुरेश पानगावकर, वय ३६ वर्षे, रा. पिंप्री अंबा, ता. जि. लातूर असे सांगितले. त्याच्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या मिळून आल्या. तसेच अंगझडतीमध्ये तब्बल ५१ सिलिंडरच्या टाक्या विक्री करून मिळवलेले १ लाख ७७ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. अधिक चौकशी केली असता सदर ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्या अहमदपूर, बुधोडा, जांब व इतर ठिकाणांहून चोरी केल्याचे तसेच रोख रक्कम चोरीच्या सिलेंडर विक्रीतून प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले.
अभिलेख तपासणी व जप्त मुद्देमालाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक, रेणापूर, अहमदपूर, गांधी चौक, एमआयडीसी, मुरूड, चाकूर, औसा तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
नमूद आरोपीकडून ऑक्सिजन सिलेंडरच्या २० लोखंडी टाक्या १,४५,०००, रोख रक्कम १,७७,०००, बोलेरो पिकअप वाहन १२,००,००० असा एकूण मुद्देमाल १४,५७,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर गुरनं. ३०९/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस या गुन्ह्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, राजेश कंचे, आनंद हल्लाळे, गोविंद भोसले, पाराजी पुठेवाड, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफडे यांनी ही कारवाई केली.
#Latur #LaturNews #LaturPolice #LaturCrime #OxygenCylinder #OxygenChori #CrimeNews #MaharashtraPolice #LaturKar #MarathiNews #BreakingNews #LCB #LocalCrimeBranch #Mukhed #Nanded #Ahmedpur #Ausa #Chakur #Murud #Renapur #MIDC #लातूर #लातूरपोलीस #ऑक्सिजनसिलेंडर #गुन्हेगारी #मराठीबातमी #ब्रेकिंगन्यूज
Latur, Latur | Nov 5, 2026