
१० वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास; चाकूर पोलिसांच्या तपासाला यश
लातूर :अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. ३, लातूर यांनी ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी देण्यात आला.
याप्रकरणी आरोपी *गोविंद साधू नाईकवाडे (वय ५०, रा. उजळंब, ता. चाकूर, जि. लातूर)* याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडलेल्या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाणे गु.र.नं. ४८८/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२), ३३३ तसेच पोक्सो कायदा कलम ८ व १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी केला. तपासादरम्यान उपलब्ध पुरावे व साक्षीदारांच्या आधारे आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष पोक्सो खटला क्र. १५३/२०२४ मध्ये सुनावणीअंती अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. ३ चे न्यायाधीश मा. श्री. एस. ए. सय्यद यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार चंद्रकांत राचमाळे व प्रमोद तरडे यांनी काम पाहिले. ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे यांनी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला.
बालकांविरुद्धच्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास, सक्षम न्यायालयीन पैरवी व ट्रायल मॉनिटरिंग सेलच्या समन्वयातून दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
Latur, Latur | Nov 7, 2026