
उदगीरच्या बाह्यवळण चार पदरी रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश; शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार
उदगीर :उदगीर शहरातील वाढती वाहतूक आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय मार्ग निधी (CRIF) अंतर्गत उदगीर शहरातील नळेगाव रोड ते बिदरकडे जाणाऱ्या बाह्यवळण चार पदरी रस्त्याच्या ४.२० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
आ. संजय बनसोडे यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, या निधी मंजुरीमुळे उदगीरच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.
उदगीर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण होतो. परिणामी नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहरातून जाणाऱ्या वाहनांमुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवरही परिणाम होत असून, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील बाह्यवळण रस्त्याच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ४.२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नळेगाव रोड ते बिदरकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना बाह्यवळण मार्गाचा वापर करता येणार असून, शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार असून, अपघातांचा धोका कमी होण्यासही हातभार लागेल. उदगीर शहराच्या भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करता हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
३५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने उदगीर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला मोठे बळ मिळाले आहे. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा बाह्यवळण रस्ता शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सदर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेञा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
#Udgir #SanjayBansode #UdgirNews #Latur #BypassRoad #35Crore #CRIF #NitinGadkari #DevendraFadnavis #Maharashtra #Development #UdgirVikas #PrimeLiveNews
Latur, Latur | Nov 8, 2026