
कल्याण-डोंबिवलीकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी मध्यरात्रीपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
केडीएमसीचा मोठा निर्णय; कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही फटका, पाणीपुरवठा बंदच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी टँकरनेही पाणी मिळणार नाही!
कल्याण : राज्यातील कमी पाऊस आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या पाणीकपातीचा परिणाम कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर गावांवर होणार आहे. तसेच बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत दर आठवड्याला गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे KDMC कडून सांगण्यात आले
टँकरनेही पाणी मिळणार नाही!
पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन KDMC मार्फत करण्यात आले आहे
Kalyan, Thane | Nov 17, 2026