राजकीय वाटा वेगळ्या, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकावर दोन्ही शिवसेना एकत्र! कल्याणच्या भगवा तलावावर शिंदे आणि ठाकरे गटाकडून अभिवादन; स्मृतिदिनी जुन्या आठवणींना उजाळा!
राजकारणात शिवसेनेचे दोन गट झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची भावना आजही कायम असल्याचे कल्याणमध्ये पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील काळा तलाव अर्थात भगवा तलाव परिसरातील त्यांच्या भव्य स्मारकाला शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिवादन केले. राज्यभरात दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे स्मृतिदिन साजरा केला जात असताना कल्याणमध्ये मात्र दोन्ही गटांचे शिवसैनिक एकाच स्मारकावर नतमस्तक झाले. स्मारक परिसरात भजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवे यांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळत उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी बाळासाहेबांना दैवत संबोधत भगवा तलाव परिसर ही आपल्यासाठी पुण्यभूमी असल्याची भावना व्यक्त केली.
Kalyan, Thane | Nov 17, 2026