वेतनवाढीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कल्याण सत्र न्यायालयातील १७३ कर्मचारी आंदोलनात!
राज्यभरातील ३४ हजार कर्मचारी संपात सहभागी असल्याचा महासंघाचा दावा; न्यायालयीन कामकाज ठप्प
कल्याण : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात कल्याण सत्र न्यायालयातील १७३ कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी न्यायालयाबाहेर ठिय्या देत काम बंद आंदोलन सुरू केले. एकही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने न्यायालयीन कामकाज ठप्प झाले असून, त्याचा फटका पक्षकार आणि वकिलांना बसत आहे.
राज्यभरातील तब्बल ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा महासंघाने केला आहे. २२ मेपासून शासनाकडे वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असून, अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता राज्य शासन या मागणीबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kalyan, Thane | Nov 17, 2026