
शेतातील वादातून मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयाचा दणका; प्रत्येकी २,५०० रुपये दंड, जखमीस ५,००० रुपये नुकसानभरपाई
लातूर : शेतातील वादातून ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी २,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, जखमी फिर्यादीस ५,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मौजे गादवड, ता. जि. लातूर येथील शेतशिवारात शेतीच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादी नवनाथ विठ्ठल भिसे यांना मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार होती. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाणे गु.र.नं. १४३/२०२०, कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये दिनांक २३ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपी १) अनिकेत उर्फ गणेश भारत भिसे, २) भारत निवृत्ती भिसे, ३) महानंदा भारत भिसे, सर्व रा. गादवड, ता. जि. लातूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्ही. टी. चौगुले यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण आरसीसी क्रमांक ८६६/२०२० अन्वये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय लातूर येथे चालले.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती नागरगोजे यांनी उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे तिन्ही आरोपींना भादंवि कलम ३२४, ३२३ व ३४ अन्वये दोषी ठरविले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी २,५०० रुपये याप्रमाणे एकूण ७,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्रीमती सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कोर्ट पैरवीचे काम पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पाहिले. तर मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील अंधारे यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली.
Latur, Latur | Nov 7, 2026