अकरा फुटी मगरीने शेतात घातला थरार; देवणी पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
देवणी, ता. १४ : बोरूळ येथे ऊसाच्या शेतात तब्बल ११ फूट (साडेतीन मीटर) लांबीची पूर्ण वाढ झालेली मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि देवणी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, वनविभाग व सर्पमित्रांच्या मदतीने या महाकाय मगरीला जेरबंद करण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरूळ शिवारातील एका शेतकऱ्याला उसाच्या शेतात मोठी मगर असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्याने तातडीने देवणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वनविभागाचे अधिकारी बोराडे आणि स्थानिक सर्पमित्रांना पाचारण केले.
सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वन अधिकारी बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मगरीची वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.
देवणी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचा जीव वाचला असून, सर्व स्तरांतून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Latur, Latur | Sep 15, 2026