अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; उदगीर तालुक्यात पत्रकारांकडून 11 गावांत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उदगीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनापुरता कार्यक्रम न घेता उदगीर तालुका पत्रकार जयंती महोत्सव समितीने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. समितीच्या वतीने उदगीर तालुक्यातील 11 गावांतील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नावंदी, नळगीर, सोमनाथपूर, लोणी, वाढवणा, शेल्लाळ, मलकापूर, हेर, निडेबन, रावणगाव आणि लोहारा या दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन पत्रकारांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. "शिक्षण हेच खरे हत्यार" हा अण्णाभाऊंचा विचार कृतीतून पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पत्रकारांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमधून सर्वत्र कौतुक होत आहे.
हा संपूर्ण उपक्रम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, उपाध्यक्ष अर्जुनराव जाधव, सचिव सुनील हवा पाटील, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, सहसचिव विश्वनाथ गायकवाड, कोषाध्यक्ष नागनाथ गुट्टे आणि संघटक बसवेश्वर डावळे यांच्या पुढाकारातून आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
Latur, Latur | Aug 23, 2026