लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार १० हजार कोटींपर्यंत नेण्यात यश — धीरज देशमुख
लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून बँकेचे संचालक धीरज विलासराव देशमुख यांनी सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि संचालक मंडळाचे आभार मानले. जिल्हा बँकेला लाभलेली सहकाराची समृद्ध संस्कृती जपत युवक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवहार १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे कार्य करता आले. पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने बँकेचा कारभार पुढे नेण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले,” असे धीरज देशमुख यांनी यावेळी सांगितले.
बँकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देता आले, याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग सेवांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी बँकेने आधुनिक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीने आधुनिक आणि तत्पर सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्राहकाभिमुख सेवा, तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक कारभार यामुळे बँकेवरील सभासद व ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
शाखा विस्तारासाठी सहकारमंत्र्यांकडे मागणी
यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा विस्तारासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत आधुनिक बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी शाखाविस्तार महत्त्वाचा असल्याचे धीरज देशमुख यांनी स्पष्ट केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बँकेचे सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सहकाराच्या माध्यमातून बँकेला आणखी सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
.
.
#DilipraoDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #BabasahebPatil #DhirajDeshmukh #ldccb
Latur, Latur | Aug 20, 2026