
लातूर जि.प. मध्ये 'सेवा संकल्प' अंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; 123 तपासण्या, 13 जणांचे रक्तदान
लातूर, दि. २४ - राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर 'सेवा संकल्प अभियान' आणि 'श्री गणेश आरोग्य अभियान' राबविले जात आहे.
या अभियानांतर्गत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून आज जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्राथमिक निदान, वेळेवर उपचार आणि नियमित आरोग्य तपासणी व रक्तदानाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.
या शिबिरासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात एकूण १२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ७५ पुरुष व ४८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी तसेच सर्व विभाग प्रमुखांनी भेट देऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कौतुक केले असून या शिबिरामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
Latur, Latur | Sep 25, 2026