
उदगीर मध्ये 25 ऑक्टोबरला अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा धडकणार; आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आयोजन
उदगीर दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा समिती व आंबेडकर प्रेमी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य महामोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 59 जातीसमूह आणि समस्त आंबेडकरी प्रेमी जनतेच्या वतीने 25 ऑक्टोबर 2026, रविवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे भव्य 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महामोर्चाचे नेतृत्व मा. आनंदराज आंबेडकर साहेब करणार आहेत.
या महामोर्चाच्या माध्यमातून अ, ब, क, ड अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी व शासकीय क्षेत्रातील सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, असंवैधानिक उपवर्गीकरणासाठी नेमलेली बदर समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत.
या महामोर्चाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. आनंदराज आंबेडकर, मा. ॲड. अमण दादा आंबेडकर, मा. ॲड. डॉ. सुरेश माने, मा. चंद्रकांत हंडोरे साहेब, माजी मंत्री मा. राजकुमार बडोले साहेब, माजी मंत्री मा. बबनराव घोलप, मा. रोहिदास बनसोडे साहेब, मा. जितेंद्र कुमार इंदिसे, मा. दादासाहेब शेळके, मा. राजू थाटे, मा. रुक्मिणी लोंढे यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांचे व आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी, तसेच आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आपला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी 59 जातीसमूहांसह सर्व आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी 25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उदगीर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा समिती, उदगीर च्या वतीने करण्यात आले आहे.
Latur, Latur | Sep 30, 2026