
किरकोळ कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांना अटक, ठाकरे चौकातील घटनेचा छडा
लातूर:( प्राईम लाईव्ह न्युज नेटवर्क) लातूर शहरातील ठाकरे चौक परिसरात किरकोळ कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात झाले. या घटनेची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 462/2026, कलम 109(1), 115(2), 353, 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथकांमार्फत तपास सुरू केला.
ठाकरे चौक परिसरातील गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी बारकाईने तपासले. फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणातून हल्ल्यात सहभागी आरोपींची ओळख पटविण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 1) अभिषेक निळकंठ काळे (वय 23), रा. निवळी, ता. जि. लातूर, सध्या रा. प्रकाशनगर, दत्त मंदिरासमोर, लातूर, 2) जतीन अरुण गायकवाड (वय 20), रा. रामेश्वर, ता. जि. लातूर, सध्या रा. पुणे, 3) शिवप्रसाद गोविंद सोनवणे (वय 19), रा. कुलस्वामिनी नगर, पीव्हीआर चौक, लातूर यांचा समावेश आहे. तपासादरम्यान जतीन गायकवाड हा पुणे येथे वास्तव्यास असून घटनेनंतर पुण्याहून लातूर येथे आल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठाकरे चौक परिसरातील ओंकार गणेश मंडळाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला. उपलब्ध फुटेजचे बारकाईने परीक्षण करून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. त्यामुळे घटनेनंतर अल्पावधीतच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करणे शक्य झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे तसेच पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामधील पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस अंमलदार संजय फुलारी, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे, नारायण शिंदे, प्रशांत ओगले, राहुल सोनकांबळे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राजाभाऊ मस्के व डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि. तिडके करीत आहेत.
Latur, Latur | Oct 1, 2026