
डीजे-डॉल्बीच्या कर्कश आवाजाविरोधात किल्लारी पोलिसांची कारवाई; गणेश मंडळ अध्यक्षासह डीजे चालक-मालकावर गुन्हा दाखल
लातूर: गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी लातूर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असताना, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना कर्कश आवाजात डीजे-डॉल्बी वाजवणाऱ्या गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालक-मालकाविरुद्ध किल्लारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किल्लारी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 308/2026, भा.न्या.सं. कलम 223, 3(5) सह कलम 52/182(अ)(4) मोटार वाहन कायदा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.17 वाजण्याच्या सुमारास मौजे रामेगाव, ता. औसा येथील हनुमान मंदिराजवळील चौकात वक्रतुंड गणेश मंडळासमोर सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
आरोपी संदीप बालाजी शेळके, रा. रामेगाव, ता. औसा हे वक्रतुंड गणेश मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी विनापरवाना गणपतीची स्थापना करून डीजे लावल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दुसरा आरोपी सिद्धेश्वर गोविंद दुधभाते, वय 21 वर्षे, रा. कोतल शिवणी, ता. निलंगा, जि. लातूर याने त्याच्या ताब्यातील वाहनावर परवानगीशिवाय फेरबदल करून त्यावर डीजे-डॉल्बीची व्यवस्था करून कर्कश व मोठ्या आवाजात वादन करून ध्वनी प्रदूषण केले.
शासनाने डीजे-डॉल्बी न वाजविण्याबाबत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर गुन्हा दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.11 वाजता दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाने केली आहे.
#LaturPolice #KillariPolice #DJAction #GaneshUtsav2026 #LaturCrime #SoundPollution #MaharashtraPolice
Latur, Latur | Sep 25, 2026