
राजा उदार झाला, हाती भोपळा दिला; दुष्काळाच्या सरकारी घोषणांवर आमदार अमित देशमुख यांची टीका
लातूर :महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 265 तालुक्यांत कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना शासनाने ज्या उपाययोजना जाहीर केल्या, त्यातून दुष्काळग्रस्तांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. ही परिस्थिती म्हणजे 'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला' अशीच आहे, अशी घणाघाती टीका आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
आमदार देशमुख यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर यावर्षीचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा अधिक तीव्र आणि गंभीर असल्याचे म्हटले आहे. असे असताना अगोदरच माफ असलेले वीजबिल व शेतसारा माफ करण्याची घोषणा करणे म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केवळ परीक्षा शुल्क माफी करून आपण काहीतरी केले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी 6 प्रमुख मागण्या केल्या आहेत :
काँग्रेसच्या 6 मागण्या
1. शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 1 लाख रुपये आणि शेतमजुरांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करावी.
2.विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, तसेच यावर्षीच्या पिक नुकसानीची 50 टक्के रक्कम पहिला हप्ता म्हणून ताबडतोब द्यावी, असे आदेश शासनाने द्यावेत.
3.टंचाईच्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी तातडीने यंत्रणा उभारावी.
4.पशुधन जतन करण्यासाठी लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.
5.खरीपाची सर्व पिके वाया गेल्याने शेतकरी, शेतमजुरांना पाल्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही, त्यामुळे दुष्काळी भागातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
6. दुष्काळी भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन भत्ता जाहीर करावा.
शासनाने पहिल्या टप्प्यात वरील मागण्या मंजूर करून दुष्काळग्रस्तांना धीर द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
Latur, Latur | Sep 26, 2026