
हिंदी ही सर्वसमावेशक भाषा - डॉ. सादिक शेख यांचे प्रतिपादन
उदगीर, दि. २५ (प्राईम लाईव्ह न्युज डिजिटल) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हिंदी भाषेचे मोठे योगदान आहे. देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदीने केले असून भारतीय संस्कृतीचे प्रकटीकरण अनेक साहित्यिकांनी हिंदीतून प्रभावीपणे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी हिंदी ही सर्वसमावेशक भाषा असल्याचे प्रतिपादन कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हडोळती येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. सादिक शेख यांनी केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त हिंदी विभागातर्फे 'राष्ट्रवाणी' भित्तिपत्रकाचे विमोचन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख तथा प्रभारी प्राचार्य डॉ. एन. जी. एमेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सादिक शेख उपस्थित होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. वसंत पवार, प्रा. विरभद्र बिरादार, प्रा. गणेश बिरादार आणि हिंदी मंडळाच्या प्रमुख कु. ऐश्वर्या कांबळे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सादिया आत्तार, अंजली कांबळे, राऊ कांबळे या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विरभद्र बिरादार यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. सादिक शेख म्हणाले, हिंदी भाषेतून प्रभावीपणे बोलल्यास व्यक्तिमत्व विकासाला आकार येतो. रोजगाराशी हिंदीचा जवळचा संबंध आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी राष्ट्र आणि संस्कृतीला विसरू नये, असे आवाहन करत त्यांनी कविता सादर केली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एन. जी. एमेकर म्हणाले, आज देश-विदेशात हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. भाषेला जनसामान्यच आश्रय देतात. सर्वांनी मिळून ही भाषा पुढे कशी जाईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागातील डॉ. श्रीदेवी बिरादार आणि हिंदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु. साधना गायकवाड हिने केले, तर आभार कु. ऐश्वर्या कांबळे हिने मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latur, Latur | Sep 26, 2026