
हुंड्यासाठी छळ; मुलगी असल्याने गर्भपात केल्याचा आरोप, उदगीरमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा
उदगीर : माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भातील मुलगी असल्याचे कारण देत जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ११ जून २०२१ पासून ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सासरच्या मंडळींनी संगनमत करून फिर्यादीस माहेरून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण व शिवीगाळ केली. तसेच मांत्रिकाला बोलावून अघोरी कृत्य व जादूटोणा केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोटात मुलगी असल्याचे सांगून धाराशिव येथील एका खासगी दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ८९, ८५, ११५(२), ३५२, ३(५) सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक रेडेकर यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
Latur, Latur | Sep 30, 2026