
सायबर साक्षरता ही आता काळाची गरज - पोलीस निरीक्षक दयानंद पाटील
लातूर, : सोशल मीडियाचा वाढलेला वापर सायबर गुन्हेगारीसाठी कारणीभूत ठरत असून सायबर साक्षरता ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लातूर शहरातील द्वारकानगरी येथे लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, सध्या किशोरवयीन मुलांच्या फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा, त्याचे फायदे आणि धोके याबाबत मुलांना जागरूक करणे आवश्यक आहे.
सध्या डिजिटल अरेस्टचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नागरिकांना मादक पदार्थ किंवा तस्करीच्या गुन्ह्यात अडकवल्याची भीती दाखवून पोलीस असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली जाते. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. संशयास्पद कॉल आल्यास घाबरून जाऊ नये, पोलीस कधीही ऑनलाईन पद्धतीने अटक करत नाहीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी लोकसंवाद उपक्रमाची माहिती दिली. यावेळी द्वारकानगरी सोसायटीचे अध्यक्ष उदयसिंह देशमुख, सचिव प्रेम सूर्यवंशी, कोषाध्यक्ष केशव शिरसाट, गणेश मंडळाचे अध्यक्ष वैष्णव रेड्डी, उपाध्यक्ष आदित्य देशमुख, सचिव श्रीशैल्य झुरळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत भिसे यांनी केले.
Latur, Latur | Sep 25, 2026