
उदगीरमध्ये धक्कादायक घटना : १० लाखांसाठी विवाहितेचा ५ वर्षे छळ, अंगावर लिंबू कापून जादूटोणा अन् मुलगी म्हणून गर्भपात केल्याचा आरोप; सासरसह ७ जणांवर गुन्हा
उदगीर : माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा तब्बल पाच वर्षे अमानुष छळ केल्याची आणि मुलगी पोटात असल्याचे कारण सांगून जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहर पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे.
या प्रकरणी पीडित विवाहिता अदीबा अजमअली शेख (वय २७, रा. खाजापुरा, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, २०२१ पासून तिच्या सासरच्या लोकांनी पैशांसाठी शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक जाच सुरू केला होता. एवढ्यावरच न थांबता तिच्यावर जादूटोणा करण्यासाठी तांत्रिकाला बोलावून अंगावर लिंबू कापण्यासारखे अघोरी प्रकार केले गेले. तसेच पोटात मुलगी आहे असे सांगून तिला धाराशिव येथील दवाखान्यात नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला.
याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०३/२०२६ दाखल झाला असून BNS कलम ८९, ८५, ११५(२), ३५२, ३(५) आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३(२) लावण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी : पती आजमअली शेख, सासरे युसुफ शेख, नणंद शेख समरी, नणंद शेख अरसिया (सर्व रा. खाजा नगर, धाराशिव), मुफ्ती जुनेद (रा. बुलढाणा), अब्दुल हफिज आणि मुसेब काझी (दोघे रा. धाराशिव).
या गुन्ह्याचा तपास पोउपनि पाटील हे करीत असून पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
Latur, Latur | Sep 30, 2026