इमारती पाडण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई.. .
.
.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात ममता फाउंडेशनच्या इमारती आणि निवासी घरे पाडण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये हे आरोपी रोख रक्कम स्वीकारताना पकडले गेले.
नेमकं काय घडलं?
तक्रारदाराने मांगडेवाडीत हुजूरपागा शाळेजवळ बांधकाम केले आहे. मुख्य आरोपी, 'भीम संघर्ष संघटने'चा संस्थापक व अध्यक्ष विनोद निवृत्ती गायकवाड याने या बांधकामाविरोधात पुणे महानगरपालिकेकडे (PMC) तक्रार केली होती. जर १० लाख रुपये दिले नाहीत, तर सर्व इमारती पाडून टाकू, अशी धमकी त्याने तक्रारदाराला दिली होती.
यापूर्वीच उकळली होती रक्कम:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने आधीच तक्रारदाराकडून एक 'टायटन' घड्याळ आणि गुगल पे द्वारे १०,००० रुपये घेतले होते. तर दुसरा आरोपी संग्राम सोनावणे याने ५,००० रुपये गुगल पे द्वारे घेतले
पोलिसांचा फिल्मी स्टाईल ट्रॅप:
तपासादरम्यान, आरोपींनी तक्रारदाराला खंडणीचा पुढचा हप्ता म्हणून ५०,००० रुपये कात्रज येथील 'किनारा हॉटेल'मध्ये घेऊन येण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिथे सापळा रचला. गायकवाड आणि सोनावणे हे ५० हजारांची रोकड स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात दबोचले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. विनोद निवृत्ती गायकवाड (वय ४३, रा. वेल्हे, पुणे)
२. संग्राम दत्तात्रय सोनावणे (वय ३०, रा. वेल्हे, पुणे)
३. सुधीर मुगुट शेडगे (वय ३८, रा. मांगडेवाडी, पुणे)
४. निलेश बबन कुंभार (वय ४२, रा. भोर, पुणे)
गुन्हा दाखल व जप्ती:
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ३४५/२०२६) दाखल केला आहे. आरोपींकडून ७,०९,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पुढील तपास करत आहेत.
.
.
.
#PuneCrime #KatrajNews #BharatiVidyapeethPolice #ExtortionCase #PunePolice #CrimeNewsMarathi #PuneMunicipalCorporation #KatrajCrime #MaharashtraPolice #ActionAgainstCrime #BreakingNewsPune #LawAndOrder #PuneNewsUpdates
Haveli, Pune | Jun 28, 2026