शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा; १२० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पोतदार इंटरनॅशनल हायस्कूल, कल्याण पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत ही कार्यशाळा पार पडली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पोतदार इंटरनॅशनल हायस्कूल तसेच लाभ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजवणे, शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्याबाबत जनजागृती करणे हा होता.
या कार्यशाळेत सुमारे १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाडू मातीला विविध आकार देत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. मातीच्या साध्या गोळ्यापासून गणरायाची मूर्ती तयार होताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद निर्माण झाला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना शाडू मातीचे पर्यावरणीय महत्त्व, गणेशमूर्ती तयार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, मूर्तीला आकार देताना घ्यावयाची काळजी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रशिक्षक व मार्गदर्शक मीनल लेले यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उपआयुक्त रामदास कोकरे तसेच कार्यकारी अभियंता डॉ. शैलेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजा करून गणेशोत्सवानंतर पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विसर्जनानंतर उरलेली माती पुन्हा संकलित करून जतन करावी आणि पुढील वर्षी त्याच मातीचा पुनर्वापर करावा, असा पर्यावरणपूरक संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
पोतदार इंटरनॅशनल हायस्कूलच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद, विद्यार्थी, सामाजिक संस्था, प्रशिक्षक आणि महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासोबतच ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्याची सकारात्मक प्रेरणा मिळाली.