सोलापूर, दि. १७ ऑक्टोबर २०२६ : शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर येथे मा. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (गुन्हे व विशेष शाखा) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविद्यालयातील बी.ए., बी.एस्सी., एम.ए. आणि विधी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सायबर क्राईम अवेअरनेस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत उद्भवणारे विविध सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे तसेच सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री. अविनाश पाटील, पो.कॉ. अंबलगी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी, पासवर्ड व यूपीआय पिन कोणाशीही शेअर न करणे, तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती आणि छायाचित्रे शेअर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान ऑनलाइन आर्थिक फसवणूक, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना, टास्क व जॉब फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक, सायबर बुलिंग, मॉर्फिंग, डीपफेक आणि ब्लॅकमेलिंग अशा विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणांसह माहिती देण्यात आली. तसेच सायबर गुन्हेगारांकडून मानवी भावनांचा गैरफायदा घेताना लोभ, भीती आणि आकर्षण यांचा कशा प्रकारे वापर केला जातो, हे सोप्या व प्रात्यक्षिक स्वरूपातील उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी डिजिटल सुरक्षिततेचे नियम पाळणे, सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा मजबूत करणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे, संशयास्पद संदेशांची पडताळणी करणे आणि आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधणे, तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदविणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे सर, डॉ. गायकवाड मॅडम, तसेच विविध विभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
69 views | Solapur, Maharashtra | Oct 17, 2026