अंबिवलीतील यशोदीप विद्यालयात नेमबाजी प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंची पहिल्याच वर्षी डीएसओ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताची वाढती कामगिरी पाहता नेमबाजीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. ग्रामीण व उपनगरी भागातील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मोहोने येथील छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अंबिवली, मोहोने व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ओपन साइट एअर रायफल शूटिंग अकादमी सुरू करण्यात आली आहे. यशोदीप विद्यालय येथे श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ व छत्रपती क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षक आकाश जनार्दन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नेमबाजीचे तांत्रिक प्रशिक्षण देतानाच शिस्त, एकाग्रता, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. आधुनिक प्रशिक्षण पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित सराव करून घेतला जात आहे.
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी खेळाडूंनी डीएसओ शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षिता सिंगल हिने कांस्यपदक, रणवीर गायकवाड याने रौप्यपदक तर जतिन माधवी याने कांस्यपदक पटकावले. या तिन्ही खेळाडूंनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
या यशामुळे अंबिवली, मोहोने आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नेमबाजी या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, पालकांकडूनही या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.
यावेळी प्रशिक्षक आकाश काळे म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता असते. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य दिशा मिळाल्यास ग्रामीण व उपनगरी भागातील खेळाडूदेखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात. छत्रपती स्पोर्ट्स क्लबचा उद्देश केवळ पदकविजेते घडवणे नसून शिस्तबद्ध, आत्मविश्वासू आणि सक्षम खेळाडू घडवणे हा आहे.”
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या या उपक्रमामुळे परिसरातील होतकरू खेळाडूंना घराजवळच दर्जेदार नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पहिल्याच वर्षी मिळालेले यश हे भविष्यातील मोठ्या कामगिरीची नांदी ठरत असून, या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kalyan, Thane | Oct 6, 2026