दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन; दोन हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रवी पाटील फाउंडेशन आणि एस जी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आचार्य अत्रे रंगायतन, कल्याण येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिम परिसरातील विविध शाळांमधून जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअरच्या विविध संधींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कल्याण पश्चिम परिसरातील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याने उपलब्ध जागेनुसार विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, भविष्यातील संधी तसेच विविध क्षेत्रांतील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. संबंधित तज्ज्ञांनी आतापर्यंत देशभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांना आणि पन्नास हजार पालकांना मार्गदर्शन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरकडे न पाहता आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य क्षेत्राची निवड करावी. भविष्यात कल्याण शहरातील विद्यार्थी आयएएस, आयपीएस, डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसह विविध क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवावेत, यासाठी अशा मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Kalyan, Thane | Oct 7, 2026