पाटण्यात बनावट पनीर कारखान्याचा पर्दाफाश; दूध, तूप आणि पनीरमध्ये घातक रसायनांच्या वापराचा आरोप, ३० किलो फॉर्मालिन जप्त!
पाटणा, बिहार : बिहारची राजधानी पाटणा येथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कथित बनावट दुग्धजन्य पदार्थांच्या कारखान्याचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. बख्तियारपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा टाकण्यात आला.
छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट दूध, पनीर, तूप आणि क्रीम जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दुग्धजन्य पदार्थांची आणि साहित्याची एकूण किंमत चार लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारखान्यातून तब्बल ३० किलो फॉर्मालिन जप्त करण्यात आले आहे. फॉर्मालिन हे धोकादायक रसायन असून त्याचा वापर प्रामुख्याने प्रयोगशाळांमध्ये नमुने आणि मृतदेहांचे जतन करण्यासाठी केला जातो. दुग्धजन्य पदार्थ अधिक काळ खराब होऊ नयेत यासाठी या रसायनाचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे.
कारखान्यात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आल्याने अन्न सुरक्षा विभागाने कारखाना सील केला आहे.
या कारवाईनंतर नागरिकांच्या ताटात पोहोचणारे दूध, पनीर आणि तूप कितपत सुरक्षित आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नफ्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
\#PatnaNews #FakePaneer #FoodSafety #FoodAdulteration #BreakingNews
Pune City, Pune | Nov 24, 2026