विरार-अलिबाग कॉरिडॉरविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार! खारबांव नाक्यावर ‘रस्ता रोको’; १४ गावांतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी आक्रोश
“योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळालेच पाहिजे!” शेतजमीन, घरं आणि रोजगार वाचवण्यासाठी भूमिपुत्रांची एकजूट; विकासाच्या नावाखाली बळी देण्यास तीव्र विरोध
विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १४ गावांतील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी सहभागी झाले होते.
या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, घरं आणि रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बाधितांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि न्याय्य हक्क मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की, “आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचा बळी देणे योग्य नाही.”
खारबांव नाका येथे समस्त भूमिपुत्र मोठ्या संख्येने एकत्र आल्याने आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील १४ गावांतील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Kalyan, Thane | Oct 7, 2026