उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर; ग्रामीण भागात पाणीटंचाईवर प्रशासन अलर्ट - गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार
उदगीर ( प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क): उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून, ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली.
श्री. मेडेवार यांनी सांगितले की, सध्या उदगीर तालुक्याच्या ग्रामीण भागात सात ठिकाणी पाणी स्रोतांचे अधिग्रहण सुरू आहे. एखाद्या गावात पाणी कमी पडल्यास सुरुवातीला विहीर अधिग्रहण केले जाणार असून, पाणी पुरत नसेल तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना आराखडा तयार करण्याचे आदेश
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या सध्याच्या पाणी स्रोताचे पाणी किती दिवस पुरेल, याचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. हा स्रोत नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत किती दिवस चालेल, याचे नियोजन करून घेतले जात आहे. त्यानंतर प्रथम अधिग्रहण आणि गरज पडल्यास टँकरची व्यवस्था केली जाणार आहे.
तलावांच्या पाण्याची परिस्थिती जलसंधारण विभागाकडून घेण्यात येत असून, यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने प्रशासनाने स्रोतांची माहिती घेऊन पुढील नियोजन पूर्ण केले असल्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी स्पष्ट केले.
Udgir News, Latur Dushkal, Pani Tanchai, BDO Narendra Medewar, Gram Panchayat
Latur, Latur | Oct 1, 2026