
उदगीर तालुक्यात अवैध सावकारांवर सहकार विभागाचा मोठा प्रहार; ५ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी
उदगीर (प्रतिनिधी) सर्वसामान्य शेतकरी व गरजूंना अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर सहकार विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. उदगीर शहर व तालुक्यातील पाच सावकारांच्या निवासस्थानांवर व दुकानांवर एकाचवेळी छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी भारत बायटेडवाड व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रमेश अंबेसंगे (आनंतनगर, उदगीर), कोंडीबा तुकाराम मुंडे (जाधववाडी) व विलास शिवाजी बोरगावे (हंडरगुळी) या तिघांनी अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ५ पथकांनी खालील ठिकाणी झडती घेतली -
१) साधू रामचंद्र कांबळे, संत रोहिदास नगर, उदगीर
२) पप्पू उर्फ संतोष पहाडे व राजीव बिरादार, नव्या मोंढा, उदगीर
३) फिरोजखान नामरुद्दीन पठाण, नगर परिषद कॉम्प्लेक्स, उदगीर
४) अमोल अशोक कोतळवार, मन रोड, उदगीर
५) विक्रम माने, हाळी, ता. उदगीर
झडतीदरम्यान कोरे धनादेश, कोरे मुद्रांक (स्टॅम्प), रोकडवही, जमिनीचे खरेदीखत, वसुलीच्या चिठ्ठ्या व आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आढळून आली असून पंचनाम्यानंतर ती ताब्यात घेण्यात आली आहेत.
विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक व्ही.एल. पोतारगळे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी डी.बी. कांबळे, शरण देशमुख, आर.एस. गायकवाड, मुख्य लिपिक एस.जे. जाधव, जे.एस. घोले यांच्यासह १२ कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार करण्यात आली होती. यासाठी महसूल, कृषी व दुय्यम निबंधक विभागाचे १० कर्मचारी पंच म्हणून तर पोलीस विभागाचे १० अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.
अवैध सावकारीला बळी पडलेल्या नागरिकांनी निर्भयपणे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर किंवा जिल्हा उपनिबंधक, लातूर यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Latur, Latur | Sep 2, 2026