
*लातूर पोलिसांची राष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी*
डिजिटल पोलिसिंगमध्ये लातूर देशात अव्वल, ई-साक्ष्य लिंकिंगमध्ये ९९.९८% कामगिरी
*लातूर, दि. ४ नोव्हेंबर -* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने लातूर जिल्हा पोलीस दलाने देशात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ई-साक्ष्य आयडी निर्मिती आणि लिंकिंगमध्ये ९९.९८ टक्के कामगिरीसह लातूर जिल्ह्याने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यामुळे डिजिटल पोलिसिंगमध्ये लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे. या यादीत सिक्कीममधील एका जिल्ह्याने द्वितीय, तर हरयाणाच्या रेवारी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
*काय आहे ई-साक्ष्य प्रणाली?*
गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावे अधिकृत पद्धतीने नोंदवून त्याला स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक (SID) देणे आणि तो संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडणे, म्हणजेच ई-साक्ष्य लिंकिंग. यामुळे पुराव्यांची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि न्यायालयीन प्रक्रियेत उपयोगिता वाढते.
*यशामागे टीमवर्क*
पोलीस अधीक्षक *अमोल तांबे* यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार या मोहिमेला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-अंमलदारांकडून हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून घेण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेचे *अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण* यांनी सातत्याने आणि बारकाईने मॉनिटरिंग केले. नियमित आढावा, सूचना आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी समन्वयामुळे हे राष्ट्रीय यश शक्य झाले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लातूरला डिजिटल पोलिसिंगमध्ये देशात अग्रेसर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ही कामगिरी केवळ आकडेवारी नाही, तर लातूर पोलिसांची कार्यक्षमता, तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आणि उत्कृष्ट टीमवर्कचे प्रतीक आहे.
Latur, Latur | Sep 5, 2026