
"पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अघोरी विधीचा कट, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पंधरा आरोपींवर पोक्सो व नरबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल
उदगीर, दि. 16 : पैसा मिळविण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुलीचा वापर करून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 4 राज्यांतील 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटीजवळ हा प्रकार घडला. पोलीस नाईक संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 577/2026 दाखल झाला आहे.
आरोपींनी संगणमत करून "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अंधश्रद्धेय विधी करण्याचे नियोजन केले होते. यासाठी महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 चे कलम 3(3) तसेच पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत.
गुन्ह्यातील पीडित 15 वर्षीय मुलगी आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील आहे. आरोपींमध्ये बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील मजूर, चालक व व्यावसायिकांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. वेळीच कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
Latur, Latur | Aug 16, 2026