
आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी विक्री करणारे दोघे ठाणे पोलिसांच्या ताब्यात
२ किलो ६२० ग्रॅम अंबरग्रीस जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे २ कोटी ७२ लाख रुपये किंमत
ठाणे : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या आणि कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ किलो ६२० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे येथील पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ठाणे पश्चिमेतील जांभळी नाका परिसरातील हायलँड रेसिडेन्सी लॉजजवळ पोलिसांनी सापळा रचला.यावेळी मयूर विश्वास पाटील (रा. कोल्हापूर) आणि मिनाद्री मधुकर मोहिते (रा. सिंधुदुर्ग) हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ किलो ६२० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (Ambergris) आढळून आली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे समोर आले. त्यापासून उच्च दर्जाचे अत्तर तसेच सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत मोठी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.जप्त करण्यात आलेले अंबरग्रीस हे वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित असून, ते विनापरवाना बाळगणे व विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४४, ४८, ४९(ब), ५७, ५१ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-९, ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे करीत आहेत.
Kalyan, Thane | Oct 7, 2026