
चाकूरमधील जबरी चोरी उघड; शतकवीर आंतरराज्यीय गुन्हेगारासह दोघे जेरबंद
लातूर :चाकूर तालुक्यात महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींपैकी एकावर चार राज्यांमध्ये १०१ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बुधवारी (दि. ३) नवीन रेणापूर नाका परिसरात दोन संशयित होंडा शाईन मोटारसायकलसह थांबल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दुपारी दोनच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले.
राहुल बादल बंजारा उर्फ पंडितसिंग धरमसिंग जुन्नी (५३, मूळ पाली, राजस्थान, सध्या परळी, बीड) आणि बच्चनसिंग मंगलसिंग बावरी (४५, परळी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, धारदार चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तिसरा साथीदार जगजितसिंग दुधानी हा फरार आहे.
मुख्य आरोपी राहुल बंजारा हा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रात ६८, गुजरातमध्ये २०, राजस्थानमध्ये ११ आणि कर्नाटकात २ असे एकूण १०१ गुन्हे दाखल आहेत. त्यात घरफोडी, दरोडा, दरोड्याची तयारी आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Latur, Latur | Sep 3, 2026