
कल्याणच्या भावार्थ दौंड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भावार्थ भागवत दौंड यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना संघटित करणे, युवकांमध्ये राष्ट्रहिताची भावना रुजविणे, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ युवकांपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी भावार्थ दौंड कार्यरत राहतील.
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार, युवा नेतृत्वाची जडणघडण, युवकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे, या उद्दिष्टांसाठी ते विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या नियुक्तीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि महाराष्ट्रातील युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल भावार्थ दौंड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले असून, पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, समर्पणाने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Kalyan, Thane | Oct 6, 2026