कर्तव्यनिष्ठेचा सर्वोच्च सन्मान!
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’
कल्याण : दीर्घकालीन आणि निष्कलंक पोलीस सेवेसाठी कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते होनमाने यांना हे पदक प्रदान करण्यात आले.या पूर्वी २०२४ साली होनमाणे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले होते .यंदा पुन्हा एकदा त्यांना भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून अत्य उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याने होनमाने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
पोलीस शिपायापासून सहाय्यक पोलीस आयुक्तपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यातील घानंद या गावात अशोक होनमाने यांचा जन्म झाला. गावातील शाळेत त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले.
१९८९ मध्ये पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पोलीस दलात कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि १९९३ मध्ये MPSC परीक्षा दिली. त्यानंतर १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते पोलीस दलात अधिकारी पदावर रुजू झाले.कारकिर्दीत त्यांनी मुंबई, दहिसर, नवी मुंबई, पालघर, माणिकपूर, भिवंडी तसेच कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
जटील गुन्ह्यांच्या तपासात हातखंडा
अनेक जटील आणि आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास करून त्यांचा छडा लावण्यात होनमाने यांचा विशेष हातखंडा आहे. कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा आणि तपासातील कौशल्यामुळे पोलीस दलात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
पोलीस शिपाई म्हणून सुरू झालेला प्रवास सहाय्यक पोलीस आयुक्त पदापर्यंत पोहोचला आणि त्यात आता ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ची मानाची भर पडली आहे. त्यांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि उल्लेखनीय पोलीस सेवेचा हा राष्ट्रीय स्तरावरील गौरव मानला जात आहे.