पोलादपूर: पावसाची चाहूल लागताच घाटमाथ्याकडे मेंढपाळांची परतीची वाटचाल सुरू
कोकणात पावसाळ्याचे आगमन जवळ आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून कोकणात वास्तव्यास असलेले घाटमाथ्यावरील मेंढपाळ आता आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हे मेंढपाळ आपल्या कळपांसह कोकणात दाखल होतात आणि उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत येथे वास्तव्यास राहतात. कोकणातील जंगल परिसरात तसेच मोकळ्या जागांमध्ये शेळ्या-मेंढ्या चारून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. याचबरोबर कोकणातील अनेक शेतकरी आपल्या शेतांमध्ये या कळपांना रात्री बसवितात.