अलिबाग: किहीम किनारपट्टीवर मराठी चित्रपटाचे शूटिंग
सरपंच प्रसाद गायकवाड, हर्षदा पाटील यांनी केले स्वागत
Alibag, Raigad | Oct 6, 2026 रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि परिसरातील आकर्षक लोकेशन्समुळे चित्रपट निर्मात्यांकडून या भागाला सातत्याने पसंती दिली जात आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम किनारपट्टीवर सध्या एका मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, या शूटिंगदरम्यान किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड आणि सासवणे ग्रामपंचायत सदस्य हर्षदा पाटील यांनी चित्रपटातील कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. शूटिंग सुरू असताना सरपंच प्रसाद गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य हर्षदा पाटील यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते समीर चौगुले तसेच उपस्थित सर्व कलाकारांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांना गुलाबाची रोपे भेट देण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे शूटिंगच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. किहीमचा निसर्गरम्य समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, हिरवाई आणि समुद्रकिनाऱ्यालगतचा परिसर यामुळे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यापूर्वीही रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मराठी तसेच अन्य भाषांतील चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रायगडच्या निसर्गसौंदर्याला व्यापक प्रसिद्धी मिळत आहे. किहीम परिसरात सुरू असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगमुळे स्थानिक नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ परिसरात दाखल झाल्याने शूटिंगस्थळी नागरिकांचीही उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर अशा चित्रीकरणासाठी आवश्यक सहकार्य मिळावे आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.