आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’चा नवा अध्याय
2.8k views | Gondia, Maharashtra | Oct 8, 2026 गोंदिया, दि. ६ : सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून महत्त्वाच्या व जिल्हास्तरीय पदांवर गुणवत्ताधारित पदस्थापना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. अधिकाऱ्यांच्या मागील तीन वर्षांतील उपलब्ध व प्रमाणित कामगिरीचे १०० गुणांच्या निकषांवर मूल्यमापन केले जाणार असून,आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’चा नवा अध्याय सुरू होणार आहे. यामुळे शासकीय आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि प्रशासकीय गतिमानता वाढविण्याचा शासनाचा उद्देश आहे. राज्यातील नागरिकांना दर्जेदार व गतिमान आरोग्य सेवा देणे, मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि नीती आयोगाने निश्चित केलेले शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी कामगिरीवर आधारित पारदर्शक पदस्थापना प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. ही कार्यपद्धती जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह शासन निर्णयात नमूद केलेल्या संबंधित पदांना लागू राहील. शासन आवश्यकतेनुसार अन्य तत्सम जिल्हास्तरीय प्रमुख आरोग्य पदांचाही या कार्यपद्धतीत समावेश करू शकेल.